24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभिवंडीत भाजपमधील वाद चव्हाट्यावर

भिवंडीत भाजपमधील वाद चव्हाट्यावर

निकालाआधीच करेक्ट कार्यक्रमाचा इशारा पाटील-कथोरेंत जुंपली

ठाणे : प्रतिनिधी
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यात लढत झाली. तुल्यबळ उमेदवार असल्याने पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे ठाकले. त्यामुळे यावेळी अंदाज बांधणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे कपिल पाटील यांना पक्षातीलच काही लोकांनी दगा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कपिल पाटील संतापले असून, आता त्यांनी थेट करेक्ट कार्यक्रमाची भाषा केली आहे. त्यामुळे भिवंडीत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार किसन कथोरे आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात सख्य नाही. त्यामुळे सातत्याने कोणत्या ना कोणत्या रुपाने सामना पाहायला मिळतो. आता राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. त्यावर लक्ष केंद्रित झालेले असताना आता काही ठिकाणी पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. भिवंडीत कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वाजली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांनी केला. एवढेच नव्हे, तर पक्षाच्या विरोधात काम करणा-यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचेही कपिल पाटील म्हणाले.

भिवंडी लोकसभेच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार किसन कथोरेंची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत कथोरे हे कपिल पाटलांना मदत करतील, अशी गॅरंटीही घेतली होती. मात्र ही गॅरंटी फेल घालवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा माणसाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही माफ करणार नाहीत, असे कपिल पाटील म्हणाले. निवडणुकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याने पक्षांतर्गत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. किसन कथोरे हेही तगडे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात आता वादाची ठिणगी पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी हा वाद उफाळून आल्याने येत्या काळात याच्या झळा अधिक तीव्र होताना दिसतील, असे बोलले जात आहे.

मुरबाड येथील एका कार्यक्रमात भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजप पक्षात असून ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मुरबाडमध्ये येऊन आमदार किसन कथोरे यांच्यासोबत एका ठिकाणी बैठक घेऊन त्यांची गॅरंटी घेतली होती. आता त्यांची गॅरंटी फेल घालवणा-या माणसाला देवेंद्रजीही माफ करणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. आमदार किसन कथोरे यांनी भाजप पक्षाच्या विरोधात काम केले असून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांची मदत केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा निश्चित करेक्ट कार्यक्रम होणार, असे कपिल पाटील म्हणाले.

कथोरे यांचे प्रत्युत्तर
आमदार किसन कथोरे यांनीही कपिल पाटील यांच्या आरोपाला जशास तसे उत्तर दिले. कपिल पाटलांनी आपल्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याने आपण या संदर्भात बोलणे योग्य नाही. मला जर विरोधात काम करायचे असते तर मी उघड काम केले असते आणि मी जर विरोधात काम केले असते तर त्याचे काय झाले असते ते सर्वांना माहीत आहे, असे आमदार कथोरे म्हणाले.

कारवाई होणार?
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर आरोप केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच कपिल पाटील यांनी केलेल्या थेट आरोपांमुळे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे ४ जूनच्या निकालानंतर भाजपचा राजीनामा देणार की, पक्ष त्यांची हकालपट्टी करणार, हे पाहावे लागेल..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR