मुंबई : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर या शिवसेना नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक घेत या दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. आमच्यातील वादावर पडदा पडला असल्याचे नंतर कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले खरे, मात्र त्याचवेळी ‘ज्याची जळते त्यालाच कळते’ असे सांगत वादाच्या निखा-यातील धग कायम असल्याचे संकेतच दिल्याचे बोलले जात आहे.
कदम यांनी कोकण दौ-यावर असताना विद्यमान खासदार असलेल्या कीर्तिकर यांच्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना गजाभाऊ उभे न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारीची मागणी करतील, असे म्हटले होते. त्यानंतर या दोघांमध्ये मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून हा वाद सुरू झाला होता. कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना कीर्तिकर यांनी थेट प्रसिद्धिपत्रक काढत त्यांना ‘गद्दार’ असे म्हटले होते. त्यावर कदम यांनी कीर्तिकर यांचे वय झाले असून आता त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोघांना ‘वर्षा’वर बोलावून मध्यस्थी केली.
‘भविष्यात काही वाद-विवाद झाल्यास त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलले पाहिजे, परस्पर माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. तसेच शिंदे यांना तशा सूचना देण्याची विनंती केली. त्यामुळे आता खासदार कीर्तिकर यांच्याशी कोणतेही वाद नाहीत, गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा! मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून ते खासदार आहेत आणि
भविष्यात पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ’, असे कदम यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. ‘परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीला उद्धव ठाकरेंपेक्षा खूप मोठे यश मिळाले आहे. खूप मोठा विश्वास राज्याने दाखवलेला असताना दोन नेत्यांमध्येच आपापसांत वाद असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर असणे हे भूषणावह नाही, याची जाणीव मलादेखील आहे. त्यामुळे भविष्यात दोघांकडूनही कुठला वाद होणार नाही’, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली होती.
‘चुकीच्या आरोपांनी व्यथित’
कीर्तिकरांच्या खासगी आयुष्यावरून केलेल्या टीकेचे कदम यांनी समर्थन केले. ‘कालपर्यंत गजाभाऊ हे अनेकदा घरी आलेत, चहा-जेवण केले आणि अचानकपणे आता गद्दार म्हणतात हे कितपत योग्य आहे’, असा प्रश्न त्यांनी केला. ‘मी कधीही कमरेखालची टीका केलेली नाही. माझ्यावर गजाभाऊंनी चुकीचे आरोप केले. मी ५०-५५ वर्षांच्या राजकारणात कोणताही डाग लावून घेतला नाही. त्यामुळे अशा आरोपांनी व्यथित झालो असून, ‘ज्याची जळते त्याला कळते’ अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.