जिंतूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील २ मराठा तरुणांना तहसीलदारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेतला आहे.
त्यानुसार तालुक्यातील सावरगाव येथील गावातील नमुना ३३वर कुणबी असल्याची नोंदी आढळून आल्यामुळे गावातील तरुण गोविंद ढवळे व भागवत ढवळे यांनी इ महासेवा वरून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना उपविभागीय अधिका-यांकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. कुणबी प्रमाणपत्र प्राप्त होताच तहसीलदार राजेश सरोदे यांनी तहसील कार्यालयात दोन्ही तरुणांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत राखे, सकल मराठा समाजाचे बालाजी शिंदे सोसकर, माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे उपस्थित होते.