परभणी : पशुवैद्यकीय चिकित्सालय टाकळी अंतर्गत मौजे नांदापूर येथे दि. १८ नोव्हेंबर रोजी चारा साक्षरता उपक्रमांतर्गत पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी १०२ पशुपालकांना प्रत्येकी ५ किलोप्रमाणे ५.१ क्विंटल मका चारा बियाणे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परभणी पंचायत समिती उपसभापती विवेक रसाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. धनंजय देशमुख, डॉ. इंगळे, डॉ. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अजय धमगुंडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पशुपालकांना पशुआहार, चारा प्रक्रिया, वैरण विकास, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प योजनाबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात सोयाबीनच्या गुळीवर युरीया प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहेद देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सामाले यांनी केले. यशस्वितेसाठी गंगाधर रसाळ, नंदकिशोर देशमुख, गोविंद बुलबुल, माऊली लाड, चव्हाण, भीसाळ यांनी प्रयत्न केले.
















