पाथरी : सामाजिक बांधिलकी जपत आणि शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या पवित्र उद्देशाने प्रमोद भैया मित्र मंडळ आणि इएसएल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ढालेगाव येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. इएसएल कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत कंपनीच्या सहका-यांनी आणि मित्र परिवाराने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमातून शेकडो गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अमोल शिंदे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कोल्हे पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत करणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. इएसएल कंपनी आणि प्रमोद भैया मित्र मंडळाने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान शिंदे, उपाध्यक्ष नारायण आतकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी ढालेगावचे भागवत शिंदे, बंटी शिंदे, बाबासाहेब शिंदे, सतीश झोल, विक्रम शिंदे, माउली शिंदे, बाळू शिंदे, माउली शिंदे, राजेभाऊ लिंबोरे यांच्यासह इएसएल कंपनीचा संपूर्ण मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















