24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबुरखा वाटप; महायुतीत वादाची ठिणगी

बुरखा वाटप; महायुतीत वादाची ठिणगी

भाजप आक्रमक, विरोधकांचाही हल्लाबोल शिंदे गटाचे कान टोचण्याचा प्रयत्न

मुंबई : भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर भाजपने तत्काळ आक्षेप घेतल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाज आठवू लागला का? अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर महायुतीतील भाजपनेही शिंदेंच्या शिवसेनेला चांगलेच सुनावले असून या घटनेवर भाजप नाराज असल्याचे सुत्राकडून माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महायुतीकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मुस्लीम समाजाचा मिळालेला लक्षणीय पाठींबा पाहता या समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामिनी जाधव भायखळ्याच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या दक्षिण मुंबईतून पराभूत झाल्यात. ज्यात मुस्लीम मतांचा फॅक्टर महत्वाचा होता. यामिनी जाधव यांनी मंगळवारी मुस्लीम समाजातील महिलांना बुरखावाटप केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला चांगलेच डिवचले आहे.

आम्हाला मान्य नाही : शेलार
बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपनेही आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे हे मान्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हा निवडणुकीच्या कॅम्पेनचा भाग : यामिनी जाधव
या वादानंतर आमदार यामिनी जाधव यांनी हा निवडणुकीच्या कॅम्पेनचा भाग असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लीम व्होट बँकमुळे उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले असा आरोप करणारे शिंदे गटाचे नेते आता काय भूमिका घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपनेही या बुरखा रणनीतीला विरोध दर्शवल्याने ठाकरे आणि शिंदेमध्ये संघर्ष रंगण्यापूर्वी महायुतीतच ‘बुरखा’ वादाचा ठरल्याचे चित्र आहे.

राज्यात ढोंग सुरू आहे : अंधारे
सकाळ-संध्याकाळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करणा-या शिवसेना शिंदे गटाला आता मुस्लीम समाजाची गरज वाटू लागली का? विकासाचे मुद्दे नसल्याने मतांवर डोळा ठेवून प्रत्येक योजना तसेच कार्यक्रम राबविले जात आहेत. एकीकडे पदोपदी मुस्लीमद्वेष पसरवण्याचे काम करायचे आणि दुसरीकडे मुस्लीम महिलांना बुरखावाटप करण्याचे ढोंग करायचे अशी दुट्टूपी भूमिका शिंदे गटाची असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR