पूर्णा : शहरातील नवा मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मागील काही महिन्यांपासून तिस-या मजल्यावर स्थलांतरित केल्यामुळे बँकेतील दिव्यांग बांधवांसह ज्येष्ठ नागरिक, ग्राहकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिव्यांग बांधवांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कुठलीही सुविधा नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये जाण्यासाठी सोबत एक ते दोन व्यक्तींना त्यांना उचलून न्यावे लागत आहे.
त्यामुळे बँकेचे लवकरात लवकर सोयीच्या जागी स्थलांतर करावे अशी मागणी होत आहे.
दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना बँकेतून विशेष काउंटर केलेले नाही. त्यामुळे बँकेत मोठी गर्दी होत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्मचारी कमी पडत असल्याने बँकेच्या ग्राहकांना दोन तीन चक्रा मारावे लागत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी बँक स्थलांतरित करून व कर्मचा-यांची संख्या वाढवण्यात यावी. तसेच बँकेकडून दिव्यांगासह ज्येष्ठ नागरिकांना विशेष सोयी सुविधा पुरवाव्यात, ग्राहकाची गैरसोय टाळावी, बँक तिस-या मजल्यावरून लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी पक्ष संघटनांकडून करण्यात आली आहे.