सोलापूर : एक हजार ३६५ जणांचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिका-यांकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मयत ३० जणांचे शस्त्र परवाने कायमचे रद्द केले आहेत. तर एका व्यक्तीने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्र खरेदी न केल्याने त्यांचाही परवाना रद्द केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांनी स्वत:कडील शस्त्रे लोकसभा निवडणुकीवेळी पोलिस ठाण्यांमध्ये जमा केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली, तरीदेखील सुमारे साडेतेराशे जणांनी शस्त्रे नेलीच नाहीत.
जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांकडून संबंधितांना शेवटची नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्या एक हजार जणांचे परवानेही रद्द होण्याची शक्यता आहे. चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एकाने २००४ मध्ये शस्त्र परवाना घेतला, २०२० पर्यंत परवान्याचे नुतनीकरण केले, पण त्यांनी शस्त्र विकत घेतले नव्हते. त्यांनी पैसे नसल्याने शस्त्र खरेदी न केल्याचा जबाब दिला आणि त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली, तरीदेखील त्यांनी शस्त्र न घेतल्याने त्यांचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.
संदीपान अजगरे, नारायण अजगरे (रोपळे, पंढरपूर), मालोजीराव विनायकराव निंबाळकर (वैराग, बार्शी), विठ्ठल रोंगे (खर्डी, पंढरपूर), लालासाहेब पाटील (चारे, बार्शी), भागवत पाटील (कौठाळी, पंढरपूर), गुलाबगीर गोसावी (नवी पेठ, पंढरपूर), अरविंदगीर गोसावी, सुभाषगिरी गोसावी (दाळे गल्ली, पंढरपूर), विजयकुमार शहा (करकंब, पंढरपूर), लक्ष्मण चव्हाण (सुस्ते, पंढरपूर), उत्तम पाटील (भानसळे, बार्शी), ज्ञानेश्वर मोरे (पटवर्धन कुरोली, पंढरपूर), बाळासाहेब बारबोले (कासारवाडी रोड, बार्शी), अजयकुमार देशमुख (कासेगाव, पंढरपूर), पांडुरंग पाटील (भाळवणी, पंढरपूर), अप्पासाहेब भोसले (सुस्ते, पंढरपूर), दादामहाराज मनमाडकर (स्टेशनरोड, पंढरपूर), नारायण ऊर्फ बाळकृष्ण घाटे (यावली, बार्शी), लक्ष्मणदास शर्मा (गुज्जर घाट, पंढरपूर), अब्दुल गनी तांबोळी (बार्शी), हरी कुलकर्णी (देवगाव, बार्शी), भरमण्णा येळमेली, देवप्पा येळमेली (आंदेवाडी, अक्कलकोट), संदीपान गलांडे (जवळगाव न. १, बार्शी), निजगोंडप्पा बिराजदार (चिंचोळी, अक्कलकोट), शिराजोद्दीन शेख (हैद्रा, अक्कलकोट), दरेप्पा अरवत (कोर्सेगाव, अक्कलकोट), सिद्राम शिंगे (कलहिप्परगे, अक्कलकोट), ज्ञानोबा माळी (फुलचिंचोली, पंढरपूर) या ३० मयत व्यक्तींचे शस्त्र परवाने जिल्हाधिका-यांनी रद्द केले आहेत.