आपली इच्छाशक्ती मजबूत असेल तर सर्वकाही मिळवता येणे शक्य आहे. ही बाब गेल्या काही वर्षांत दिव्यांग खेळाडूंनी सिद्ध करून दाखविली आहे. पॅरा खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर देशाच्या गौरवात भर घातली आहे. हे खेळाडू देशातील दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान बनत आहेत. दुसरीकडे बदलत्या भारतीय समाजाचे प्रतीकही ठरत आहेत. एकेकाळी ग्रामीण भागात अवहेलना सहन करणारे दिव्यांग तरुण-तरुणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. देशातील पॅरा अॅथलिटला प्रोत्साहन देण्यासाठी या महिन्यात ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह आणि कामगिरी पाहता ते आता कोणाच्याही मागे राहू शकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. स्पर्धेनिमित्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘खेलेगो, तो खिलोगे.’’ ही बाब दिव्यांग खेळाडूंच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत आहे.
या स्पर्धेत दोन्ही हात नसलेली नेमबाज शीतल देवी यांची कामगिरी पाहून तर सर्वजण थक्क झाले. अशा कामगिरीची कल्पना कोणीही केलेली नसेल. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील दुर्गम भागातील लोई धार गावात जन्मलेल्या शीतल देवी यांना जन्मजात हात नव्हते. हा पालकांना तर धक्का होताच, परंतु शीतल देवी यांच्यासमोर तर आयुष्य होते. पण लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. कटरा येथील माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाची नेमबाजांसाठी अकादमी आहे. लष्कराच्या एका अधिका-याने दोन वर्षांपूर्वी या अकादमीचे प्रशिक्षक कुलदीप यांना शीतलविषयी सांगितले. त्यांच्यासाठी पाय आणि छातीने चालविण्यात येणा-या धनुष्याची निर्मिती तयार करण्यात आली आणि हे प्रयत्न एका यशस्वी खेळाडूच्या रूपातून फळाला आले.
शीतल देवी या भारताचे नाव उंचावत आहेत. शीतल यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये यश मिळवले आहे आणि आता त्यांचे लक्ष्य पॅरिस येथे होणा-या पॅरालिम्पिकमध्ये पोडियमवर स्वार होण्याचे आहे. ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये यश मिळवणारे थाळीफेकपटू योगेश कथुरिया, टेबल टेनिस स्टार भवीना पटेल, पारूल परमार किंवा संदीप डांगी यांची कामगिरी रोमहर्षक आहे. वास्तविक या खेळाडूंनी शारीरिक व्यंग्याला आयुष्यभराचा दोष मानण्याऐवजी त्याच्यावर मात करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा ध्वज फडकविण्याचा निर्धार केला. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता विचार करा, एखाद्या आठ वर्षांच्या मुलाला अर्धांगवायूचा झटका आला असेल तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू होईल का? परंतु योगेशने ते सिद्ध करून दाखविले आहे. पॅरा गेम्समध्ये मुलांनी केलेली अचाट कामगिरी ही अशा कुचेष्टांना दिलेला सणसणीत चपराक आहे. यामुळे लोकांची मानसिकताही बदलू लागली आहे. हांगझू पॅरा आशियायी स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या कृष्णा नागरला देखील समाजाची अवहेलना सहन करावी लागली होती. ते बुटके असल्यामुळे त्यांच्या घराजवळील लोकांनी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.
-कमलेश गिरी