पुणे : अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी, २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली आहेत. संस्था, सामाजिक संघटना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारीला लागल्या आहेत. शहरातील बाजाराला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने शहरात व उपनगरातील वातावरण राममय झाले आहे. बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाजारात भगवे झेंडे, पताका, बॅनर्स विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. श्रीरामांचे चित्र असलेल्या झेंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. हे झेंडे उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. शहरातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरीही विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. प्रभू रामांच्या मूर्तीबरोबर आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. ठिकठिकाणी धार्मिक विधी पूजा, गीत रामायण कार्यक्रम यावेळी पार पडत आहेत. काही ठिकाणी मिरवणुकीत राम मंदिराची प्रतिकृती, भाविकांसाठी विविध स्पर्धा, त्याचबरोबर नृत्य, भजन, भावगीते आणि एक दिवस राम नामाचा जप, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील रस्ते, मुख्य चौक झाले राममय
शहरातील मुख्य चौकात शुभेच्छापर फ्लेक्स लागले आहेत. सिंहगड रस्ता, हडपसर रस्ता, सातारा रस्त्यावर रामभक्तांनी ठिकठिकाणी भव्य मिरवणूक, आरती, प्रसाद, लाडू वाटप असे विविध उपक्रम गणेश मंडळ, सामाजिक संस्था व मंदिरात २२ जानेवारीला घेतले जाणार आहेत. शहरासह उपनगरेही भगवी झाली असून, सर्वत्र राममय आनंद उत्सव साजरा केला जात आहे.
राम पूजन साहित्यांची मागणी वाढली
शहरात श्रीरामांचे चित्र असलेले झेंडे ४० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. भगवी टोपी १५ रुपये, श्रीरामाचे चित्र असलेले बिल्ले १० ते ३० रुपये, भगवे गमजे २० रुपये, दुचाकीला लावण्याचे छोटे झेंडे २० ते ५० रुपये, आकाश कंदील ४०० ते ७०० रुपयांना उपलब्ध आहेत. प्रभू श्रीरामाची छबी असलेली फोटो फ्रेम ५० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत आहे. या साहित्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
श्रीरामाची दीड, दोन फुटांच्या मूर्तीची किंमत अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे. तर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान असा दरबार असलेल्या मूर्तींची किंमत १० ते २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तर प्रभू रामाची फायबरची मूर्ती २५ हजारांपासून ते १ लाखांपर्यंत विक्री केली जात आहे.
राम झेंडे, पताका, पूजेचे आणलेले सर्व साहित्य एक-दोन दिवसांतच संपले. आकाश कंदीलदेखील संपले आहेत. संपूर्ण शहरात या साहित्यांची मागणी वाढली आहे. शिवाजीनगर ते कात्रजवरून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. रामलल्लाच्या विविध प्रकारच्या डेकारेशनचे साहित्य उपलब्ध असल्याने येथे मागणी वाढली आहे.
सहकारनगर भागात स्वीटचे दुकान आहे. दुकान सजवण्यासाठी राम साहित्य खरेदीसाठी आलो असता बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी असल्याने सातारा रस्त्यावरील दुकानात साहित्य खरेदी केली. उपनगरातही ठिकठिकाणी दुकाने थाटली असून राम प्रतिष्ठापनेचे साहित्य मिळत आहे. या उत्सवास दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुकानात व घरात राम कंदील, पताका व पूजेचे साहित्य खरेदी केले आहे.