पुणे/सांगली : राज्य भरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत असून राज्यात अनेक ठिकाणी ऐन दिवाळीत पाऊस पडत आहे. मात्र सांगलीत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसाचा शेतक-यांना सर्वांधिक फटका बसला आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. या पुरामुळे आष्टा-वाळवा रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सांगली जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यभरात थंडीची चाहूल
राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. तर दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात अद्याप ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाची ही शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.