17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रहंगामी भाडेवाढ रद्द केल्याने दिवाळी भेट रखडली!

हंगामी भाडेवाढ रद्द केल्याने दिवाळी भेट रखडली!

१०० कोटी बुडाले, राज्य सरकारने हंगामी भाडेवाढ रद्द केल्याने एसटी महामंडळाची गोची

नागपूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला. ही प्रवाश्यांसाठी चांगली बाब ठरली. परंतु यात महामंडळाचे अंदाजे १०० कोटी रुपये नुकसान झाले आहे. ही रक्कम शासनाने एसटीला दिली पाहिजे, यातून कर्मचा-यांना दिवाळी भेट देता येऊ शकते. त्यामुळे सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली. हंगामी भाडेवाढ रद्द केल्याने महामंडळाच्या कर्मचा-याचा दिवाळी बोनस रखडल्याचे चित्र आहे.

एसटीतील कर्मचारी व अधिका-यांंना दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी कमी पडत असल्याने इतर कर्मचा-यांप्रमाणे त्यांनासुद्धा दिवाळी सण साजरा करता यावा, या हेतूने अनेक वर्षे बंद पडलेली दिवाळीसाठी मिळणारी रक्कम दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना सुरू करण्यात आली होती. दरम्यान या काळातच एसटीचा महसूल वाढविण्यासाठी हंगामी भाडेवाढ करण्याची योजना अमलात आणली गेली. त्यातून कर्मचा-यांना दिवाळी भेट रक्कम दरवर्षी देण्यात येत आहे. दिवाळी सण तोंडावर आल्याने महामंडळाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार अद्याप अर्थसाहाय्य देण्यात आलेले नाही. ही रक्कम मिळाल्यानंतरच कर्मचा-यांना दिवाळी भेट रक्कम देण्याचा विषय मार्गी लागणार आहे.

दिवाळीदरम्यानच्या हंगामी भाडेवाढमधून एसटीला साधारण १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण भाडेवाढ मागे घेतल्याने त्यावर पाणी पडले आहे. महामंडळाच्या बस खचाखच भरून जात असल्या तरी प्रत्यक्ष एसटीच्या तिजोरीत अर्ध्यापेक्षाही कमी रक्कम पडते. यातून दैनंदिन खर्च भागविला जातो. प्रवाशांना दिल्या जाणा-या सवलत मूल्याची रक्कम शासनाकडून दिली जाते, परंतु मागील काही महिन्यांपासून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही. त्या मुळे कर्मचा-यांची देणी थकली असून फक्त पगार होईल, एवढीच रक्कम महामंडळाला दरमहा शासनाकडून दिली जात आहे.

दिवाळी भेटीसारखा आर्थिक खर्च करायचा असल्यास महामंडळाला शासनाकडे हात पसरल्याशिवाय पर्याय नाही. याही वर्षी असाच पेच निर्माण झाला असून कर्मचा-यांना दिवाळी भेट देण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांच्या रकमेच्या मागणीचा महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता हंगामी भाडेवाढमधून मिळणारे १०० कोटी रुपये शासनाने महामंडळाला द्यावे किंवा दिवाळीसाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कर्मचा-यांना दिवाळी आनंदात साजरी करता येईल, असे बरगे म्हणाले.

आता १०० कोटी शासनाने द्यावेत
दिवाळी सण जवळ येत असल्याने महामंडळातील कर्मचा-यांचे लक्ष दिवाळी भेट रकमेकडे लागून राहिले आहे. नेमकी कधी मिळणार, या विषयीची उत्सुकता कर्मचा-यांना असून राज्य सरकारच्या निर्देशाने रद्द करण्यात आलेल्या हंगामी भाडेवाढीची प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ महामंडळाला वर्ग करावी. जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागेल, असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR