17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
HomeFeatured‘डीजे’चा दणदणाट भोवला; संभाजीनगरमध्ये २५० रूग्ण

‘डीजे’चा दणदणाट भोवला; संभाजीनगरमध्ये २५० रूग्ण

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशातील अनेक भागात उत्साहाचे वातावरण होते. तरुणांसह आबालवृद्ध मिरवणुकीत थिरकले. भीमोत्सवाला उधाण आले होते. महाराष्ट्रात जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. पण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये डीजेचा हा दणदणाट भोवला. डीजेच्या समोर नाचणा-या अनेक तरुणांना डीजेच्या दणदणाटाने रुग्णालय, दवाखान जवळ करावा लागला. त्यांना कानात शिट्यांचा आवाज आणि गुंई असे ऐकू यायला लागले आहे. तर काहींचे डोके सुन्न पडले. रविवारी सायंकाळी कानाचा त्रास वाढल्याने शहरातील ७० रुग्णालयांत २५० रुग्ण दाखल झाले.

१४ एप्रिल रोजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभुतपूर्व उत्साह दिसला. क्रांती चौकात तर जणू तरुणाईचा सागर उसळला होता. पुण्याहून १५ डीजे शहरात बोलविण्यात आले होते. कानठळ्या बसविणा-या डीजेसमोर तरुणाई थिरकली. या डीजेंचा आवाज जवळपास १५० डेसिबलपर्यंत गेला होता.

रविवारी रात्री आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत ७० रुग्णालयांत २५० रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये १७-४० वयोगटातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश असल्याचे समोर आले आहे. हा आवाज असाच राहिल्यास ७२ तासांच्या आता उपचार न घेतल्यास बहिरेपणा येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR