नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतक-यांच्या आंदोलन तीव्र झाले आहे. शेतकरी बॅरकेड्स तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. केंद्रातील एनडीए सरकार अडून बसले आहे, त्यामुळे आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. पहिला पर्याय शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य करा, तर दुसरा शेतक-यांना दिल्लीत जाण्याची परवानगी द्या.
पंजाब-हरियाणाला लागून असलेल्या शंभू सीमेवर बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेदरम्यान डड्डेवाल म्हणाले, ‘शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये.
सरकारने एमएसपीचा कायदा करावा : पंढेर
शेतकरी नेते पंढेर म्हणाले की, आम्हाला जेव्हा-जेव्हा चर्चेचे निमंत्रण आले, तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. हात जोडून आम्ही केंद्र सरकारला आमच्यासोबत बसून आमचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली. प्रत्येक मागणीवर चर्चा झाली, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. केंद्र सरकारच्या प्रमुखांनी पुढे एमएसपी कायदा करण्यास तयार असल्याचे सांगितल्यावर परिस्थिती शांत होऊ शकते.
अडीच लाख कोटी जास्त नाही
देशातील शेतकरी आईंची मुले आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या बाजूने शांत राहणार आहोत. मात्र, निमलष्करी दलांना आमच्या रक्ताची होळी खेळायची आहे. हा देश सर्वांचा आहे, पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. १.५ किंवा २.५ लाख कोटी रुपये सरकारसाठी जास्त नाहीत. देशातील ८० टक्के लोकसंख्या या पैशावर अवलंबून आहे. आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे. आमच्या बाजूने कोणताही हल्ला होणार नाही असेही पंढेर यावेळी म्हणाले.
दिल्लीची तटबंदी
दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतक-यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतक-यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिका जाममध्ये अडकल्या आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दिल्लीत वाहतूक कोंडी
आंदोलकांच्या मोर्चापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. कांिलदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहेत. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे. डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावला झाला आहे. दिल्ली पोलिसांनी हरयाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर १३ थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.