नाशिक : पंतप्रधान मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये पोहोचताच भव्य रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. युवा महोत्सवाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी युवकांना चार कानमंत्र दिले. ते म्हणाले की, मेड इन इंडिया उत्पादनाचा युवकांनी उपयोग करावा, नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंदणी करावी, युवकांनी मद्यपानापासून दूर राहावे आणि ड्रग्जच्या आहारी जाऊ नये. तसेच आई-बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन देशातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या तीनमध्ये झाली आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन आता देशात होत आहे. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. युवकांचे सामार्थ्यमुळे भारताचा डंका जगात वाजत आहे. भारताचा या यशामागे युवापिढी आहे.
मंदिर परिसरात साफसफाई
पंतप्रधान म्हणाले की, मी अवाहन केले होते की २२ जानेवारी पर्यंत आपण सगळ्यांनी देशातील तीर्थक्षेत्र, मंदिरांची स्वच्छता करावी. यासाठी अभियान सुरू करावे. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचे तसेच मंदिर परिसरात साफसफाई करण्याचे सौभाग्य मिळाले. मी देशवासीयांना पुन्हा आग्रह करेल की, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान चालवा आणि श्रमदान करा असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मालदीवमध्ये भूकंप : एकनाथ शिंदे
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणते तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढते. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे, असे ते म्हणाले.
तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील : ठाकूर
यावेळी मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आज दहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो असताना नव्या भारताचे उज्ज्वल चित्र दिसत आहे. पण तीन महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि जेंव्हा ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असे ते म्हणाले.