नवी दिल्ली : कोलकता येथील आर. जी. कर रुग्णालयातील कनिष्ठ महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्लीच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टरांनी सुरु केलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
एम्स, आरएमएल, इंदिरा गांधी रुग्णालय यासारख्या प्रतिथयश रुग्णालयांतील डॉक्टर संपावर गेल्यामुळे मागील अकरा दिवसांपासून रुग्णांचे हाल सुरु होते. डॉक्टर कामावर परतण्यास तयार आहेत, मात्र राज्य सरकारांना त्यांच्या सुरक्षेचे उपाय योजावे लागतील, असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले होते. एम्स, आरएमएलच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला असला तरी डॉक्टरांच्या अन्य काही संघटनांनी मात्र संप कायम ठेवला आहे.
डॉक्टरांची सुरक्षितता निश्चित करण्याच्या उद्देशाने गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना केली होती. या टास्क फोर्समध्ये निवासी डॉक्टरांचा समावेश करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेले आश्वासन, देशाचे हित आणि लोकांच्या सेवेच्या भावनेतून संप मागे घेतला जात असल्याचे एम्स निवासी डॉक्टर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले. संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले आहे, त्याचे पालन केले जावे असेही असोसिएशनने म्हटले आहे.
कोर्टाने केले होते आवाहन
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप घडवून आणला असून त्यामुळे अनेक वैद्यकीय सेवांवर विपरित परिणाम झाला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यानंतर कोर्टाने या आंदोलन करणा-या डॉक्टरांना पुन्हा कामावर परतण्याचं आवाहन केले होते. तसेच जे आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत महत्वाचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.