24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?

सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?

मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

ठाणे : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे सध्या राज्यभर आरक्षणासाठी जनजागृती करत आहेत. जरांगे मंगळवारी (२१ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दाखल झाले. ठाण्यात त्यांची भव्य रॅली पार पडली. या रॅलीदरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून चालू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून आंदोलन बदनाम करू पाहणा-यांवर टीका केली.

तसेच अशा लोकांना सरकारचे पाठबळ आहे का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंर्त्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही कोणाचे ऐकणार नाही.

आम्हाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण हवे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचे सांगणे आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडतोय. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असे वाटत आहे. आम्ही शांततेचं आव्हान करतो, हे चुकचे आहे का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, रात्र-दिवस हे प्रशासन अलर्ट असते. मोर्चे, यात्रा, रॅली, सभा हे सगळे दिवसरात्र चालू असते. क्रिकेटही रात्रीच चालू असते. त्यामुळे आम्हीदेखील रात्र-दिवस लोकांकडे जातो. आम्ही शांततेची बाजू मांडत आहे. आम्ही सरकारची बाजू मांडतोय. राज्यात शांतता नांदावी असा प्रयत्न करतोय. परंतु, काहींना वाटत आहे की राज्यात दंगली व्हायला हव्यात. परंतु, आमची शांततेची भूमिका असूनही आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरागे पाटील राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आम्हीदेखील शांततेसाठीच प्रयत्न करत आहोत, तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. तुम्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांना खतपाणी घालताय का? राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय, जो समाजांमध्ये तेढ निर्माण करतोय त्याला या सरकारचं पाठबळ तर नाही ना? राज्य सरकारला राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR