मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हा खूप जास्त भयावह होता. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दहशतवादाविरोधात भारताने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी देशभरातून होत आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. अभिनेत्याने त्याचा केसरी वीर चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. यासोबतच सुनील शेट्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सुनील शेट्टीने लोकांना त्यांची पुढची सुट्टी काश्मीरमध्येच घालवण्याचे आणि आम्ही घाबरत नाही, हे दहशतवाद्यांना दाखवून देण्याचे आवाहन केले आहे. कश्मीर आपले होते आणि कायम आपले राहिल असे त्याने म्हटले आहे. लता दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड २०२५ दरम्यान माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, आपल्याला नागरीक म्हणून एकच करायचे आहे की, ते म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी सुट्टीसाठी इतर कुठेही न जाता काश्मीरलाच जायचंय. आपण त्यांना दाखवून द्यायचे आहे की आपण घाबरत नाही.
तो म्हणाला, आपल्यासाठी मानवतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे. देव सगळे पाहतोय आणि योग्य न्याय तोच करेल. पण आता आपण भारतीय म्हणून एकत्र राहिले पाहिजे. भीती आणि द्वेष पसरवणा-यांच्या जाळ्यात अडकायचे नाही. त्यांना दाखवायचे आहे की आम्ही घाबरत नाही. आपण हे दाखवायचे आहे की कश्मीर आपले होते आणि आपलेच आहे आणि कायम आपले राहणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील अधिका-यांशीही बोलल्याचे अभिनेत्याने सांगितले. सुनील शेट्टी म्हणाला, मी स्वत: फोन करून सांगितले की उद्या जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तिथे यावे, पर्यटक म्हणून किंवा कलाकार म्हणून, तिथे शूटिंग करावे लागले किंवा तिथे सहलीला जावे लागले, तर मी यायला तयार आहे. यात काश्मिरी मुलांची चूक नाही.