मुंबई :
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे गेले होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून वळसे पाटील यांची ओळख आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वळसे पाटील म्हणाले, शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, ही पूर्वनियोजित भेट होती अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ही भेट पूर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारी देखील होते. रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने भेट झाली आहे, या भेटीमागे वेगळे कारण नाही.
या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. मी अनेक संस्थांमध्ये काम करत आहे, त्या संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आणि राज्यातील शेतक-यांच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत ते शरद पवार यांच्या कानावर घातले आहेत, असेही दिलीप वळसे पाटलांनी म्हटले आहे.
संस्थांमध्ये राजकारण नाही, शरद पवारांनी कधीच राजकारण आणले नाही. राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे, आणि संस्था या समाजाच्या आहेत. सर्वच संस्थांमध्ये सर्व पक्षांचे लोक आहेत. त्यामुळे इथे देखील वेगळं काही नाही असेही ते पुढे म्हणाले. तर संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द कोणाचा, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, संस्थात्मक राजकारणात शरद पवार अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचाच शब्द अंतिम आहे.