छत्रपती संभाजीनगर – राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षासाठी आंदोलन सुरू आहे, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. १ डिसेंबरपासून सर्वांनी साखळी उपोषण करायचं आहे. राज्यभरात सर्वांनी शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळीच्या कार्यक्रमाला जाऊ नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील मराठा समाजाने जीवंत राहूनच लढले पाहिजे. गोरगरिब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढा. कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा, साखळी उपोषण ताकदीने उभा राहिले पाहिजे. आपल्या जिल्ह्या प्रत्येकाने जाऊन सांगा. १ डिसेंबरला सर्वांनी साखळी उपोषण करा. तसेच जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर तुम्ही त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे विचारा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही आजपासून मराठा समाजासाठी समाजाच्या पाठिमागे उभे रहा, असं नेत्यांना सांगा. तुम्ही पक्षाला, नेत्याला मोठं करण्यासाठी आपल्या पोरांच वाटोळ करुन गेऊ नका. नेत्यांच्या फराळाला जाऊच नका, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं. आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, त्यांच्यातील नेत्यांच्या विरोधात आहोत, समाजाच्या विरोधात नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे. याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
धनगर, मुस्लीम,मराठा समाजाचे एकच दुखणे
धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.