नवी मुंबई : मनोज जरांगे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केले. कुणबी नोंदींच्या आधारे सग्यासोय-यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याकडे दिले. यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये, असे जरांगे म्हणाले. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, हैदराबादचे १८८४ चे गॅझेट लागू करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र द्यावे, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोय-यांना जात प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली होती. माझ्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला, ३०० पेक्षा अधिक मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांमधील कर्ता पुरुष गेलेला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. या कुटुंबीयांची स्वप्नं पूर्ण करण्याची जबाबदारी मराठा समाजावर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदी मिळालेल्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं सुरू केली. ज्याची नोंद मिळालेली आहे त्या मराठा बांधवांच्या सग्यासोय-यांना जात प्रमाणपत्रं दिली जावीत, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र आणि अध्यादेश काढला याबाबत धन्यवाद, असे मनोज जरांगे म्हणाले.
महाराष्ट्राच्या वतीने एकच विनंती आहे की, मी जिवाची पर्वा न करता उपोषण केले आहे. ज्यांची नोंद मिळालेली आहे त्यांची गृहचौकशी न करता जात प्रमाणपत्र वाटप करावीत. अंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घेतले जावेत. न्या. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जावी. ओबीसी समाजाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.