बार्शी : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयावरून एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला. मात्र, नियतीने वेगळेच लिहिले होते. कट आखणारा प्रियकरदेखील या घटनेत मृत्युमुखी पडला. बार्शी तालुक्यातील महागाव पुलावर येथील तळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत प्रियकर गणेश अनिल सपाटे (२६, रा. अलीपूर रोड, बाशीं) तर पती शंकर पटाडे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले होते. याप्रकरणी बार्शी पोलिसांनी विवाहित महिला रुपाली शंकर पटाडे(३५, रा. यशवंतनगर, तुळजापूर रोड, बार्शी) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश अनिल सपाटे(२६, रा. अलीपूर रोड, बाशीं) याचे रुपाली पटाडे हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचा पती शंकर पटाडे हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. रुपाली हिला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे रुपाली हिने गणेश सपाटे यास पतीची हत्या करण्यास प्रवृत्त केले. गणेश सपाटे याने मित्र गणेश खरात याला फोन करून दारू पार्टीसाठी जाण्याचे ठरविले. चारचाकी वाहन घेऊन संध्याकाळी दोघांनी बार्शीतील वाईन शॉपमधून दारू घेतली आणि तुळजापूर रोडने पुढे गेले. वाटेत त्यांनी सपाटे याचा मित्र शंकर पटाडे याला गाडीत घेतले.
तिघे मिळून बाबी हददीतील एका हॉटेलमध्ये दारु प्यायल्यानंतर गणेश सपाटे याने तुळजापूर मार्गे धाराशिव येथे थिएटरला बारीला जाण्याचे कारण सांगून त्यांना गाडीतून महागाव तळ्याजवळ नेले. महागाव पुलावर पोहोचल्यावर येथे डान्स करू फोटो काढून म्हणून गणेश सपाटे याने गाडी थांबवली, तिघांनी मोठ्या आवाजात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. गणेश सपाटे याने त्याच्या मोबाईलमध्ये फोटोही काढले. दरम्यान, गणेश खरात सिगारेट ओढण्यासाठी गाडीत गेला. यावेळी गणेश सपाटे व शंकर पटाडे हे दोघेच पुलावर उभे बोलत होते.
दोघेजन मस्ती करत असताना अचानक, गणेश सपाटे बाने शंकरला उचलून घेतले पाण्यात ढकलेले. मात्र, प्रतिकारादरम्यान शंकर पटाडे याने गणेश सपाटे याचा गळा पकडला आणि तोही त्याच्यासोबत पाण्यात पडला. हे पाहून गणेश खरात याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही दिसले नाहीत. त्याने मित्राला फोन करुन बोलावले व नंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा तो घटनास्थळी परतला, परंतु दोघांचा थांगपत्ता लागला नाही.
अखेर, तेथेच गाडीत झोपण्याचा निर्णय त्याने घेतला. पोलिसांनी तपासाअंती रुपाली पटाडे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने गणेश सपाटे सोबतचे प्रेमसंबंध व पती शंकर पटाडे सतत अडथळा आणत असल्याचा खुलासा केला. तिने गणेशला शंकर मामाला संपव असे सांगितले होते, अशी कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.