22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रअकोल्यातून डॉ. अभय पाटील ‘मविआ’चे उमेदवार

अकोल्यातून डॉ. अभय पाटील ‘मविआ’चे उमेदवार

अकोला : प्रतिनिधी
अकोल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. डॉ. अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ४ एप्रिल रोजी आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अकोल्यात महाविकास आघाडी बैठक आज झाली. या बैठकीत डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. अभय पाटील यांच्या निवासस्थानावर ही बैठक झाली. बैठकीला अकोल्यातले महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर बैठकीला उपस्थित होते.

महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात वंचितनं काँग्रेसला दोन ठिकाणी पांिठबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पांिठबा देणार याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चेंवर स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अभय पाटील यांचे नाव जाहीर करुन पूर्णविराम दिला आहे. आघाडीचे उमेदवार अभय पाटीलच असतील. प्रकाश आंबेडकरांनी विचारा करावा, आणि मविआसोबत यावं, अशी इच्छा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली.

डॉ. अभय पाटील यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून जिल्ह्यातील संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात सुरुवात केली. त्यांनी जिल्हाभरात भेटीगाठी आणि दौरे वाढविले. मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक असलेल्या डॉ. पाटील यांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
देशातील लोकांचा कल काँग्रेसकडे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे वळल्याचा दावा करण्यात येत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसकडे उच्चविद्याविभूषित, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांत निपुण असलेले डॉ. अभय पाटील यांच्यासारखा प्रभावी व दमदार चेहरा असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अकोला लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नामवंत अस्थिरोगतज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ. अभय पाटील हे अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधील संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वांत वरच्या क्रमांकावर होते. त्यांचे वडील डॉ. के. एस. पाटील विश्व ंिहदू परिषदेत सक्रिय होते. डॉ. अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत.
भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी ‘मराठा कार्ड’ वापरण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. त्यानुसार छावा संघटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय झालेले डॉ. अभय पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. शासकीय सेवेचा त्यांचा राजीनामा सरकारने न स्वीकारल्यामुळे, त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.

दुसरीकडे अकोल्यात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नारायण गव्हाणकर हे बंडखोरी करणार असल्याचे चित्र आहे. तिकीट वाटपावरुन ते भाजपवर नाराज आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनूप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली.
उमेदवारीसाठी नारायण गव्हाणकर यांचे नाव चर्चेत आहे. अनूप धोत्रेंना उमेदवारी जाहीर झाल्याने गव्हाणकर हे भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे. खासदार संजय धोत्रे हॅट्ट्रिक करून चौथ्यावेळी लढण्याच्या तयारीत आहेत तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अँँड. प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे रिंगणात कायम राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR