32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसोलापूरमाढातील डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड टळले

माढातील डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड टळले

सोलापूर : महाविकास आघाडीने आपल्यावर अन्याय केल्याचे सांगून माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर आपले बंड मागे घेतले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेला सल्लाही त्यांनी मानल्याचे दिसते. त्यामुळे माढ्यात मोहिते पाटील यांनी जानकर यांच्यानंतर अनिकेत देशमुख यांनाही आपल्यासोबत कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला जय श्रीराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या मतदारसंघातील उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीचे निमंत्रण दिले. फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पवारांना भेटले. तो विषय संपत नाही तोच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू असताना आता स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातवानेही माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा शड्डू ठोकला होता. दोन दिवस कार्यकर्त्यांच्या लागोपाठ बैठका घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून डॉ. अनिकेत देशमुख यांनी महाविकास आघाडीकडून आम्हाला गृहीत धरले असून आमच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत अपक्ष निवडणूक – लढविण्याचा निर्णय घेतला आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून तिसरा पर्याय असावा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची माहिती डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

माढा लोकसभा मतदारसंघावर यंदा प्रथमच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने दावा सांगितला होता. शेतकरी कामगार पक्षाकडून स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. परंतु ऐनवेळी माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्याची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीनंतर महाविकास आघाडीत इच्छुक उमेदवार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले. स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू आणि २०१९ रोजी सांगोला विधानसभा निवडणुकीत तब्बल एक लाख मते मिळवणा-या डॉ. अनिकेत देशमुख यांनीही बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी चांगलीच वाढली होती.

डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. परंतु त्याच्या काही मिनिटे अगोदरच शरद पवार यांचा त्यांना फोन आला व लगेचच भेटीसाठी निमंत्रण दिले असल्याची माहिती स्वत: अनिकेत देशमुख यांनी दिली होती. यापार्श्वभूमीवर डॉ अनिकेत देशमुख व शरद पवार यांची भेट झाली आणी अनिकेत देशमुख यांनी त्यानंतर माघार घेतली असून माढा लोकसभेला मोहिते पाटील गटावर आलेले गंडांतर शरद पवार यांच्या मध्यस्तीने टळले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR