40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती

पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती

सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुस-या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार अर्ज भरत आहेत. अवघ्या देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. यातच अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला. बारामती मधील कन्हेरी मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. १९६७ पासून या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्याची पवार कुटुंबीयांची परंपरा आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, राजेंद्र पवार असे पवार कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. १९६७ पासून मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला जातो.

शरद पवारांना बारामतीकरांनी सहा दशके साथ दिल्याबाबत त्यांचे आभार आहेत असे सांगत दुष्काळ जाऊन शेतकरी वर्गाचे चांगले दिवस येऊ दे, असे साकडे घातल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. लोकशाही आहे. परंतु, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच निवडणूक आयोगाला विनंती आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना, माझे कुठल्याही विधानाला एकच म्हणणे आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असली तरी अजित पवार मला मतदान करतील. कदाचित माझा मराठीतील कार्यअहवाल अजित पवारांनी वाचला नसावा. आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देते. यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर ते मेरीटवर मलाच मतदान करतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR