मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून रविवारी पदभार स्वीकारला. मुख्य सचिव मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले. नितीन करीर हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज सौनिक यांनाच मुदतवाढ देण्यात येईल, अशी चर्चा होती मात्र करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठही सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती न झाल्याने महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महासंचालकपदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत होते मात्र त्या महासंचालक पदावर कार्य करण्यास इच्छुक नसल्याचे समजते. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे पद भूषविले.
मनोज सौनिक यांच्या जागी त्यांच्या पत्नी वरिष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची वर्णी लागेल अशीच चर्चा होती. सुजाता सौनिक या जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत तर नितीन करीर हे ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत मात्र नितीन करीर यांच्यासाठी काही जणांचा आग्रह होता. त्यानुसार डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नितीन करीर यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. प्रशासनाच्या विविध विभागात त्यांनी काम केले असून आपल्या कामाचा ठसा त्यांनी प्रत्येक विभागात उमटवला आहे. आगामी लोकसभा निवडणुका पाहता डॉ. करीर यांना मार्चंनंतर पुन्हा एकदा ३ महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. डॉ. करीर यांनी रविवारी संध्याकाळी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्याकडून स्वीकारला.
दरम्यान, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांचाही कार्यकाळ पूर्ण झाला असून ते निवृत्त झाले आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आहे मात्र त्या या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे समजते त्यामुळे महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.