25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. रमेश तारक यांना फासले काळे

डॉ. रमेश तारक यांना फासले काळे

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत विखे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर, दुसरीकडे कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील डॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याची घटना घडली आहे. तारक यांना काळे फासतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काहीजण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोधही करत आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

जरांगे यांच्या मागणीवर सरकारने १ महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. आता, दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतले आहे. पण, या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचे दिसून येत आहे. कारण, जरांगे यांच्या उपोषणास विरोध केल्यामुळे त्यांच्याच जुन्या सहका-याला काळे फासण्यात आले आहे.

पेशंट बनून आले, काळे फासले
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी २ महिन्यांपूर्वी दिले होते, २ महिन्यांनी ही घटना घडली आहे. सोमवारी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हटले, पण त्यांना माझा वाढदिवस आज नाही, असे सांगितल्यानंतरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेह-याला काळ फासले आहे, यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी डॉ. रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. अंतरवाली सराटमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याने हे काळे फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहले होते. तसेच, ग्रामस्थांच्या सह्या घेऊन या मागणीचे निवेदनही जालन्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. आता, त्याच विरोधाचा राग धरुन, झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांच्या चेह-यावर काळी शाई ओतून चेह-याला काळे फासले.

मी नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत -डॉ.तारक
या घटनेनंतर पीडित डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. मराठा समाजसोबत आहे. फक्त गावात तेढ निर्माण होऊ नये यासाठी निवेदन दिले होते. त्याचाच राग धरून माझ्यासोबत अशी घटना घडली, अशी प्रतिक्रिया डॉ. रमेश तारख यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR