मंगळूर : भारतीय किना-याजवळील हिंद महासागरात लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर ड्रोनने हल्ला केला आहे. अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनने याबाबत मोठी माहिती दिली आहे. शनिवारी पहाटे एका ड्रोनने हिंद महासागरात एका रासायनिक जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. ही आग लगेच आटोक्यात आणण्यात आली. हे जहाज सौदी अरेबियातील बंदरातून भारतातील मंगळूर येथे येत होते.
याबाबत पेंटागॉगने मोठा दावा केला आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, चेम प्लूटो हे मोटार जहाज, जे जपानी कंपनीच्या मालकीचे होते आणि नेदरलँड्समधून चालवले जाते, त्यावर लाइबेरियन ध्वज होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता गुजरातच्या वेरावळ किनारपट्टीपासून २०० समुद्री मैल अंतरावर रासायनिक टँकरवर हा ड्रोन हल्ला करण्यात आला. इराणच्या ड्रोनने हा हल्ला केला, असा दावा यात करण्यात आला आहे. या जहाजात २१ भारतीय क्रू मेंबर्स होते. भारतीय नौदलाने तैनात केलेल्या पी-८आय लाँग पल्या सागरी गस्ती विमानाने एमव्ही केम प्लुटोने हे जहाज पाहिले आणि त्याच्या क्रू मेंबर्सना सुरक्षेची खात्री दिली. भारतीय नौदलाने व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी एक युद्धनौका पाठवली आहे, तर भारतीय तटरक्षक दलाने त्यांचे जहाज आयसीजीएस विक्रम देखील व्यापारी जहाजांच्या मदतीसाठी पाठवले आहे.
आयसीजीएस विक्रमला भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मालवाहू जहाजावर हल्ल्याची बातमी मिळताच, आयसीजीएस विक्रमला त्या दिशेने जाण्याचे निर्देश देण्यात आले. संरक्षण अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील सर्व जहाजांना मदत देण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतीय तटरक्षक डॉर्नियर सागरी पाळत ठेवणा-या विमानाने एमव्ही केम प्लूटो या संकटग्रस्त जहाजाशी संवाद साधला आहे. ड्रोन हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर लगेचच पी-८आय पाळत ठेवणा-या विमानाने गोव्यातील आयएनएस हंसा नौदल हवाई तळावरून उड्डाण केले.
भारताला धोका
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धानंतर वाढत्या तणावामुळे शिपिंग मार्गांनाही नवा धोका निर्माण झाल्याचे या हल्ल्यातून दिसून येते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात भारताला अद्याप थेट फटका बसला नसला तरी गुजरातजवळील या ड्रोन हल्ल्यामुळे भारताची चिंता नक्कीच वाढणार आहे. इराण सरकार आणि येमेनमधील त्याच्या सहयोगी दहशतवादी सैन्याने गाझामधील इस्रायल सरकारच्या लष्करी मोहिमेवर जाहीरपणे टीका केली आहे. अरबी समुद्र हा भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. पेंटागॉनच्या निवेदनात म्हटले आहे की, २०२१ पासून व्यावसायिक शिपिंगवर हा सातवा इराणी हल्ला होता. दरम्यान, यावर इराणकडून अजून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.