23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील १०२१ मंडळात दुष्काळ जाहीर होणार

राज्यातील १०२१ मंडळात दुष्काळ जाहीर होणार

मुंबई : राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर इतर तालुक्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर आता इतर तालुक्यामधील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात येईल. त्यानुसार सवलती देखील लागू करण्यात आल्यात. काही दिवसांपूर्वी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी टीकेची एकच झोड उठवली होती. पण आता इतर तालुक्यांतही सवलती लागू करण्यात येणार आहेत.

१०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्याचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने जारी केला. या शासन निर्णयानुसार ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा तालुक्यांची परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली.

काय असणार सवलती?
ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे, तिथे कोणत्या सवलती देण्यात येतील याविषयी देखील माहिती देण्यात आलीये. या तालुक्यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा या सवलती लागू होतील.

४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर
काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश सरकारने जाहीर केला. एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यामध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला. जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR