सुरत : वृत्तसंस्था
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या एका संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले. १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने समुद्रामार्गे तस्करी केली जात असलेल्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले. याची किंमत तब्बल १८०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मेथामफेटामाईन नावाचे ड्रग्ज असल्याचा दावाही केला आहे. या प्रकरणी आता भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस अधिक चौकशी करीत आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली. आयसीजीला गुजरात एटीएसकडून या तस्करीविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर पश्चिम किना-यावर देखरेख करण्यासाठी सज्ज असलेले जहाज घेऊन भारतीय तटरक्षक दल व गुजरात एटीएसने ही कारवाई केली. अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी तटरक्षक दलाच्या हातून निसटली असली तरी त्यांनी अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांच्याजवळील अंमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकून दिला आणि तसेच ते बोट घेऊन पसार झाले. कारण त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करायचा होता.
छोट्या नावेच्या मदतीने अंमली पदार्थ जप्त
अंमली पदार्थ फेकून देताच तटरक्षक दलाने छोटी नाव समुद्रात उतरविली. त्या नावेवरील कर्मचा-यांनी तस्करांनी समुद्राच्या पाण्यात फेकून दिलेले अंमली पदार्थ शोधले आणि जप्त केले. आयसीजीच्या जहाजाने तस्करांच्या बोटीचा पाठलाग केला. मात्र, तस्करांची बोट सागरी सीमा पार करून निघून गेली.