सोलापूर : जमिनीच्या बटईच्या पिकातील वाटणी न दिल्याने भाऊ वसंत चव्हाण व विकास चव्हाण या दोघांनी तलवार व कोयत्याने वार केले. वडील रामचंद्र चव्हाण याने आईला काठीने मारहाण केली, अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.
तर जनावरे चारायला गेल्यावर शिवाजी चव्हाण व सचिन चव्हाण या दोन्ही भावांनी विकास व माझ्यावर तलवार व कोयत्याने वार केल्याची फिर्याद वडील रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली. या प्रकरणात परस्परविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बाळे येथील श्रीकृष्ण मंदिराशेजारी रामचंद्र चव्हाण यांचे कुटुंब राहण्यास आहे. आई, भाऊ शिवाजी हे घरी बसले असताना वडील रामचंद्र व भाऊ वसंत आणि विकास त्याठिकाणी आले. त्यांनी शेतजमिनीच्या बटईच्या पिकांमधील वाटणीचा विषय काढला. वाटणी न दिल्याने भाऊ वसंत याने डोके व हातावर तलवारीने वार केले. त्यानंतर भाऊ शिवाजी हा भांडण सोडविण्यासाठी आल्यावर विकासने कोयत्याने त्याच्या हातावर वार केले आणि आई शांताबाईला वडिलांनी काठीने मारून जखमी केले, अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली.
त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पहिल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी रामचंद्र चव्हाण (वडील) यांच्या फिर्यादीवरून मुलगा विकास शेतात जनावरांना चारा घालण्यासाठी गेल्यावर त्याला शेतात येवू न देता शिवाजी व सचिन या दोन्ही मुलांनी विकासवर तलवार व कोयत्याने वार केले. माझ्या डाव्या मनगटाजवळ व पायाच्या टाचेजवळ मार लागून जखमी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून शिवाजी व सचिन चव्हाण या दोघांविरूद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.
शेती व शेतातील पिकांच्या वाटणीवरून बालपणी एकमेकांशिवाय न राहणारे, एकमेकांच्या अंगाखांद्यावर खेळलेले भाऊ आता परस्परांचा जीव घ्यायला निघाले हे विशेष. वयस्कर आई-वडिलांनाही त्यांनी सोडले नाही, असे फिर्यादीवरून स्पष्ट होते. सर्वच संशयित आरोपी जखमी असल्याने बुधवारी संशयितांना अटक करण्यात आलेली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक बारवकर तपास करीत आहेत.