23.9 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्यामुळे डॉ. भारती पवार यांचा वांदा?

कांद्यामुळे डॉ. भारती पवार यांचा वांदा?

दिंडोरीत महायुतीची ताकद जास्त, पवारांचा प्रभाव महागात पडणार?

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. नाशिकमध्ये दोन शिवसेनेत लढत झाली तर याच जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी यांच्यात लढत झाली. खरे तर डॉ. भारती पवार २०१९ मध्ये पहिल्यांदाच खासदार झाल्या आणि त्यांना मंत्रिपद मिळाले. भास्कर भगरे यांच्यासारखा जिल्हा परिषदेचा साधा कार्यकर्ता परंतु शरद पवार यांचा मतदारसंघातील प्रभाव आणि कांदा प्रश्नी केंद्र सरकारचे धरसोड करणारे धोरण डॉ. पवार यांना जड गेल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे भगरे गुरुजी यांनी डॉ. पवार यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. त्यामुळे त्यांना यावेळी फटका बसतो की काय, अशी चर्चा जोरात सुरू आहे.

दिंडोरीत यावेळी ६२.६६ टक्के मतदान झाले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास दिंडोरीतील अन्य पाचही विधानसभा मतदारसंघांत ६२ टक्क्यांवर मतदान झाले. या मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कांद्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आणला. केंद्र सरकारने गरज नसताना डिसेंबरपासून कांदा निर्यातबंदी घातली आणि कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतक-यांचे अभूतपूर्व नुकसान झाले. अजूनही कांद्याचे दर पडलेलेच आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शरद पवारांनी या मुद्यावरून केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडले.

त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे तेवढे राजकीय बळ नसतानाही ताकद निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरली. खरे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि आ. बनकर यांच्यासारखे तगडे नेते आहेत. परंतु त्यांच्या प्रभावावर मात करून महाविकास आघाडीने येथे शक्ती उभा केली. त्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि माकपच्या नेत्यांची भक्कम साथ मिळाली. त्यामुळे राजकारणात नवखे असलेल्या भगरे सरांनी राजकारणात मुरलेल्या भारती पवारांना कडवी टक्कर दिली. त्यामुळे भगरे जाएंट किलर ठरतील, असे बोलले जात आहे.

कांद्याची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगावात आहे. केंद्र सरकारच्या कांदाविषयक धोरणांचा मोठा फटका शेतक-यांना बसला. त्यामुळे मोदी सरकारबद्दल शेतक-यांच्या मनात रोष आहे. खासदार केंद्रात मंत्री असूनही कामे होत नाहीत. भारती पवार लोकांशी संपर्क ठेवत नाहीत, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवारांविरोधात वातावरण गेले. त्यातच शरद पवारांबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती आहे. त्यातच भगरे गुरुजी म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा उमेदवार अशी प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळे भगरे जाएंट किलर ठरू शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिंडोरी, कळवण, मनमाड, निफाडमध्ये आघाडी?
मतदारसंघातील नांदगाव, चांदवडमध्ये कट टू कट सामना होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, मनमाड, दिंडोरी, कळवण, पेठ, निफाड, पिंपळगाव, वणीमध्ये तुतारी वाजल्याचे बोलले जात आहे. मुळात दिंडोरी भगरे यांचे होमग्राऊंड आहे. त्यामुळे येथे तुतारी वाजल्याची चर्चा आहे. आता याबाबतचे खरे चित्र ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR