सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यक्रमाचा संपूर्ण मंडपच उडाला. अचानक झालेल्या या प्रकाराने उपस्थित लोकांची आणि विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.
या विषयी अधिक माहिती अशी की, आई प्रतिष्ठान सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष-भारत माणिक जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विद्यार्थीनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल कृतज्ञता समारंभ व १००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण सोहळा रामवाडी परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
दरम्यान आज (शनिवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सुरू झालेला असताना अचानक हवामानात बदल झाला. जोरदार वादळी वारा वाहू लागला. दरम्यान पूर्ण मंडपावरील कापड वाऱ्यामुळे उडून गेले आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उपस्थित महिला आणि लोकांची धावपळ सुरू झाली. मात्र तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.यावेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, शहाजी पवार यांच्यासह आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पावसाने पावसाला सुरुवात झाल्याने यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना छत्रीचा आधार दिला. त्यातच पाटील यांनी भाषण सुरू ठेवले. व्यासपीठावरील माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी कार्यकर्त्याने डोक्यावर छत्री धरून पावसात भिजू नये यासाठी व्यवस्था केली. दरम्यान अशा पावसातच त्यांचा सत्कार पावसामध्ये करण्यात आला.