सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यात रेशन कार्डधारकांसाठी आणि आयुष्मान विमा कार्डसाठी ई-केवायसी मोहीम जोरात चालू आहे. मात्र अती कष्ट केल्याने ज्यांच्या बोटाचे ठसेच उमटत नाहीत; त्यांची बायोमेट्रीक प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळणार? यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी कामगार आणि शेतकरी वर्गातून होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातून लाखो शेतकरी पीकविमा काढतात मात्र अनेकांना केवळ ई-केवायसी नसल्याने (बँक आणि आधार लिंक) पैसे मिळत नाहीत असे अजून ६ हजार शेतकरी ई-केवायसीविना राहिले आहेत. यातील अनेक शेतक-यांचे शेतात अती कष्ट केल्याने हाताचे ठसे उमटत नसल्यानेही व्यत्यय येत आहे. अशातच नव्यानेही वर्षाकाठी दीड-दोन हजार शेतकरी वाढत असून, सर्वांनी ई-केवायसी केल्याशिवाय पीकविमा मिळत नाही. इतकेच कायतर जिल्ह्यात राशन दुकानदारांकडूनही सध्या सुरू असलेल्या ई-केवायसीसाठीही अनेक कार्डधारकांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याच्या तक्रारी राशन दुकानदार करीत आहेत.
आता नव्याने आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये डोळे स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र या नव्याने आलेल्या मशीन्स सर्वांकडे उपलब्ध नाहीत. आयुष्मान कार्ड, राशन कार्ड, पिकविमा, बँकांची कामे करताना अनेक कष्टकरी लोकांची बायोमॅट्रीक प्रक्रिया होत नसल्याने यासाठी शासनस्तरावरून काहीतरी ठोस उपाययोजना काढण्याची गरज आहे; अन्यथा अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी भीतीही जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.