मुंबई : असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला जवळजवळ ५० लोकांना घेऊन जाणार आहेत. यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा २८ तासांत ४० कोटी रुपये खर्च केले होते. आधी ५० खोके होते आता हे ५० लोके घेऊन जात आहेत असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाओस दौ-यावर टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘व-हाड निघालं लंडनला’ तसे हे ‘व-हाड निघालं दाओसला’ असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्ण टीम, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कोणीही बिझनेसमॅन नाहीत. येथे ५० लोक काय करतील? तिथे फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
जेव्हा तुम्ही असा दौरा करता तेव्हा वित्त विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी लागते. आता या दौ-यात १० लोकांची परवानगी दिली आहे अशी माहिती आहे. त्यात आता इतर लोकांची परवानगी या केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का? या दौ-यात मुख्यमंत्री यांच्यासोबत उद्योग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत. ज्यांना गुवाहाटीला नेलं नाही त्यांना घेऊन जाताय, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना लगावला.
एमएसआरडीसी चे अधिकारी, ओएसडी चालले आहेत. उपमुख्यमंत्री यांचे ओएसडी सुद्धा आहेत. एवढ्या लोकांची यादी तुम्ही पाहिली तर तुम्हाला धक्का बसेल. केंद्र सरकारचा अंकुश आहे की नाही? यामध्ये काही दलाल सुद्धा आहेत अशी माहिती आहे.
दाओसला जिथे ५-६ लोकांचे काम आहे, तिथे एवढे लोक का घेऊन जाताय? बॅग उचलायला.. असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या ५० लोकांत कोणीही बिझनेस मॅन नाही. हा खर्च जरी स्वत: ते करणार असले तरी एमइए ला हे माहिती आहे का? मी एमइएला हेच विचारतोय की हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय
दाओसला तीन ते चार दलाल मित्र आहेत त्यांनासुद्धा सोबत घेऊन जात आहात. मुख्यमंत्री बायकोला घेऊन जाऊ शकतात. येथे मुलांना सुद्धा घेऊन जात आहेत.सही मुख्यमंत्री करणार आहेत मग एवढ्या लोकांची गरज आहे का? महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय म्हणजे आपल्या सगळ्यांचे पैसे जात आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.