लाहौल : आधीच नैसर्गिक आपत्तींचा सामना करणा-या हिमाचल प्रदेशला आता भूकंपाचा धक्का बसला आहे. लाहौल स्पिती येथे भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.२ इतकी होती. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात आज (दि. २) सकाळी भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल होती. सकाळी ९.४५ च्या सुमारास भूकंप झाला. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या दृष्टिकोनातून हिमाचल हे भूकंपाच्या झोन चार आणि पाचमध्ये येते. कांगडा, चंबा, लाहौल, कुल्लू आणि मंडी हे सर्वांत संवेदनशील क्षेत्र आहेत.
हिमाचलमध्ये मृतांचा आकडा ७ वर
हिमाचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मृतांचा आकडा सातवर गेला आहे. सिमला, मंडी आणि कुल्लू या तीन ठिकाणी ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत ४९ जण बेपत्ता झाले आहेत. ढगफुटीनंतर अनेक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत, त्यामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचणे मोठे कठीण जात आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करणा-या हिमाचल प्रदेशात आता भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.