पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. सांगोला तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत अधिकृत ट्विट करून माहिती दिली. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून ५ किलोमीटर परिसरात त्याचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे सोलापूर परिसरात घबराट पसरली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा आदी भागात २.६ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. गुरुवारी सकाळी हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
सोलापूर जिल्ह्यात याआधी अशा स्वरूपाचा भूकंप झाल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार अनेकांसाठी अनपेक्षित ठरला.
प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले. सध्या प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, पुढील कोणत्याही संभाव्य धोक्याच्या दृष्टीने तयारी ठेवण्यात आली आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांकडून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले. भूकंपामुळे परिसरात कोणतीही पडझड किंवा इमारतींना हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यंत्रणांनी संपूर्ण परिसरात पाहणी सुरू केली आहे.