सोलापूर : संरक्षणविषयक वस्तूंची निर्यात करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असल्याने जगाचे लक्ष वेधण्यात भारत यशस्वी ठरला आहे. त्यामुळे २०२५ नंतर भारताच्या आर्थिक प्रगतीचा काळ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी सोलापूर येथील कार्यक्रमात केले.
येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने कल्पतरूकार कै. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून टिळक भारतीय अर्थव्यवस्था २०२५ व नंतर या विषयावर बोलत होते. संस्थेतर्फे यंदा हा पुरस्कार पत्रकार मनोज व्हटकर यांना टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी , दत्तात्रय आराध्ये, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, सहकार्यवाह डॉ.नभा काकडे, कार्यकारिणी सदस्य शंकरराव कुलकर्णी, रंगनाथ जोशी, रविंद्र तुळजापूरकर, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी आदीसह समाजातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरविंद जोशी होते.
यावेळी टिळक पुढे म्हणाले, राजकारण आणि अर्थकारण पूर्णपणे वेगळे आहे. भारताने १९४७ ते १९८० पर्यंत कृषीप्रधान, १९८० ते १९९१ उद्योगप्रधान तर १९९१ नंतर सेवाप्रधान क्षेत्रात आर्थिक सुधारणा घडवत प्रगती साधल्याचे दिसते. जगाच्या पाठीवर मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उत्पादनांची निर्यात महत्वाची आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी २०२० च्या अर्थसंकल्पात भारत ७५ टक्के संरक्षण विषयक वस्तूंची निर्मिती भारतातच करेल असे सांगितले होते.
तर यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूदीवरुन संरक्षणमंत्र्यांनी भारत ६२ हजार कोटी रूपयांच्या संरक्षणविषयक वस्तूंची निर्यात करेल असे म्हटले आहे. त्यामुळे २०२५ नंतरचा काळ हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा काळ असणार आहे. त्यासाठी लागणारे नियोजन हे तितकेच पक्के करताना यंदाच्या अर्थसंकल्पात एआय प्रणालीवर विशेष भर दिला आहे. देशाला सशक्त व महासत्ताक बनवण्यासाठी हे पाऊल विशेष महत्त्वाचे ठरणार आहे असेही टिळक म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी यांचे समारोपाचे भाषण झाले. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी , दत्तात्रय आराध्ये, कार्यवाह श्याम जोशी, शंकरराव कुलकर्णी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर आदी उपस्थीत होते.