मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात कारवाई करत तब्बल कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. तसेच त्यांच्या संबंधित काही ठिकाणी छापेमारी देखील केली होती. त्यानंतर आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानींना दुस-यांदा समन्स बजावले आहेत.
अनिल अंबानी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील आठवड्यात पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांना १४ नोव्हेंबर रोजी ईडीने हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.
अंबानींची याआधी चौकशी
ईडीने जुलै महिन्यातही अनिल अंबानी त्यांचे सहकारी आणि ग्रुप कंपन्यांवर छापे टाकले होते. ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना दिल्ली येथील ईडी मुख्यालयात बोलवण्यात आले होते आणि त्यांची चौकशीही करण्यात आली होती. ईडीचा हा तपास प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टच्या अंतर्गत सुरु आहे. अनिल अंबानी यांच्यावर देश सोडून जाण्याचीही बंदी घालण्यात आलेली आहे.

