नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीने बुधवारी समन्स बजावले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले. ईडीने याप्रकरणी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना शुक्रवारी (२२ डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना बुधवारी (२७ डिसेंबर) या प्रकरणी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. लालू यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात कुटुंबीयांच्या नावावर जमीन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सीबीआयने १८ मे २०२२ रोजी नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याच्या आरोपावरून लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मिसा भारती यांच्यासह १७ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या विविध विभागांतील पदांवर ‘ड’ गटातील पर्यायी नियुक्त केल्याचा आरोप करण्यात आला. २००४ ते २००९ दरम्यान झालेल्या या नियुक्तीमध्ये लालू यादव यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर जमीन घेतली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.