मुंबई : राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षामध्ये कुठेही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य शासन कठोर पाऊले उचलत आहे. सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.
तसेच, कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे भरारी पथक बनून चक्क राज्याचे शिक्षणमंत्री देखील परीक्षा केंद्रावर धडक देत आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील कै.अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियाना संदर्भात आढावा घेतला. यावेळी, त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होता कामा नये, कॉपीमुक्त परीक्षा अभियान काटेकोरपणे राबवले जाते की नाही, याची पाहणी करत केंद्र प्रमुखांना सूचना केल्या.
भोयर यांनी यापूर्वी १२ वीच्या परीक्षा सुरू असताना देखील एका परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर कसा सुरू आहे, याची पाहणी केली होती. तसेच, कॉपीमुक्त अभियानासंदर्भाने सूचना देखील दिल्या होत्या. त्यानंतर, आजपासून सुरू झालेल्या १० वीच्या परीक्षा केंद्रावरही त्यांनी धडक देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या वर्गात जाऊन पाहणी केली. आपल्या राज्यात यंदा १६ लाख विद्यार्थी १० वीची परीक्षा देत आहेत, आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालयात मी भेट दिली.
बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत एकही कॉफीचा प्रकार आढळून आला नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले. तसेच, कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत, परीक्षा केंद्रावर भेट देत असताना विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत असेही शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.