मालेगाव : प्रतिनिधी
शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मालेगाव शहरात दणक्यात स्वागत झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीने अक्षरश: रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. मंत्री भुसे यांनी मात्र स्वागत आणि सत्कारात न रमता भेट कामकाजालाही सुरुवात केली.
शिक्षण मंत्री भुसे यांनी काल आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिका-यांशी देखील त्यांनी चर्चा केली. शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी शिक्षण मंत्री भिसे यांचे स्वागत केले.
यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. थेट अॅक्शन मोडवर आलेले शिक्षण मंत्री पाहून शाळेच्या शिक्षक आणि कर्मचा-यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शिक्षण मंत्र्यांनी मतदारसंघातील देवारपाडे, भिलकोट, गुगुळवाड, सातवहाळ, चिखल ओहोळ येथील शाळांना थेट भेटी दिल्या.
चिखल ओहोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी चौथीच्या वर्गाला भेट दिली. यावेळी शिक्षण मंत्री भुसे हे महेश शिंदे या विद्यार्थ्याच्या बेंचवर बसून त्याच्याशी बोलले. महेश शिंदे या विद्यार्थ्याला त्यांनी काय शिकता, कोणता विषय आवडतो, कविता आवडतात का? असे विविध प्रश्न विचारले. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतील कविताही म्हणायला लावल्या. विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्यावर त्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या पाठीवर थाप देखील दिली
.
शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि शाब्बासकी देत असल्याने शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला. यावेळी शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्याविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इंग्रजी शाळांची लोकप्रियता अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. पालकांचाही त्याकडे ओढा असल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे यासाठी काही विशेष कार्यक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.