परभणी : जिल्ह्यातील अस्तित्वात असणा-या जुन्या भूस्रोतांच्या बळकटी करणासाठी संबंधित यंत्रणा, जिल्हा नियोजन आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून गतिशील प्रयत्न करू असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आश्वासन दिले.
वरील विषयी भाजपा उपाध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नॅशनल कंपायलेशन ऑन डायनामिक ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार भूजलाच्या अमर्याद्वापरामुळे जमिनीखालील पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर होत आहे.
परभणी जिल्हा हा गोदावरी खो-यातील सुपीक जिल्हा असताना जमिनीवरील पाण्याच्या (सरफेस वॉटरच्या) कमतरतेमुळे घरगुती तसेच शेती, औद्योगिक वापरासाठी भूजलाचा वापर मागील काही वर्षात अमर्यादपणे वाढला आहे. त्यातच जुन्या पुरातन जलस्त्रोतांच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचीही अवस्था खराब झाली आहे.
त्यामुळे येणा-या पावसाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम रहावी यासाठी याच उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. योग्य निधी उपलब्ध झाल्यास लोकसभागातून जुन्या बारवा, विहिरी, तलाव यामधून गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी जन चळवळ उभारता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.