मुंबई : आतापर्यंत हेरेगिरी करण्यासाठी माणसांना शिक्षा झाल्याचे ऐकले असेल. परंतु, मुंबईत एका कबूतराला चक्क हेरगिरीसाठी आठ महिने तपास यंत्रणांनी पकडून ठेवले होते. एवढा मोठा काळ पोलिसांच्या तपासासाठी नजरकैदेत राहिल्यानंतर अखेर या कबूतराची सुटका करण्यात आली आहे.
परंतु, हे कबूतर नेमके कोणत्या देशातून आले होते. त्याच्यावर आरोप तरी काय होता, याची माहीती ऐकली तर तुम्ही देखील चकीत व्हाल. या कबूतराच्या पंखांवर काही तरी गुप्त संदेश लिहीला होता. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्यासाठी त्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते.
मुंबईच्या चेंबूर परिसरातील राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) जवळील पीर पाऊ जेट्टीवर या कबूतरास संशयावरुन गेल्यावर्षी १७ मे रोजी पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध बाई साकरबाई दीनशॉ पेटीट हॉस्पिटल या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. या कबूतराच्या पायात कॉपर आणि एल्युमिनियमची अशा दोन रिंग होत्या. त्याच्या पंखांवर चीनी भाषेत काहीतरी मजकूर लिहीला होता. यावरुन पोलिसांना संशय आल्याने त्याचा तपास करण्यात आला.
तैवानवरुन आले होते कबूतर
पोलिसांनी या कबूतराला पकडल्यानंतर त्याला हेरगिरीच्या संशयावरुन तपास सुरु केला. त्यासाठी त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. त्याच्या पायातील रिंगचा तपास करण्यासाठी फोरेन्सिक लॅबोरेटरीची मदत घेण्यात आली. या हॉस्पिटलचे मॅनेजर डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले की, कबूतराची तब्येत एकदम ठीक आहे. त्यास पोलिस कोठडी असल्याने त्याची सूटका आतापर्यंत झाली नव्हती. आता पोलीसांनी त्याला सोडून देण्यास सांगितले आहे. या कबूतराने तैवानच्या रेसिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला होता. परंतू तेथून ते उडून एका जहाजावर बसले. तेथून ते चुकीने येथपर्यंत आल्याचे आरसीएफ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.