खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात येणाऱ्या या गाडीने एकुण सात गाड्याला धडक दिल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये गाडयांचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले तर किमान सहा ते सात जण किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र सुदैवाने जीवीतहानी झाली नाही ही घटना आज रविवारी दुपारी घडली .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी दुपारी बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतारावर असणारा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे लक्षात आले. यावेळी चालकाने एक सारखे हॉर्न वाजवत गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतारामुळे गाडीचा वेग ही वाढल्याने सात गाड्यांना उडवले. यामध्ये रिक्षासह सहा कार्सचा समावेश आहे. रिक्षासह सर्व गाड्यांचे मोठ मोठे नुकसान झाले आहे . मात्र सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
रमेश शामराव पाटील व राज रमेश पाटील बापलेक राहणार वाकुर्डे तालुका शिराळा जिल्हा सांगली व सजल गिरीराज शर्मा राहणार पुणे हे तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.