सोलापूर : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने सोमवारपासून स्वच्छता मोहिमेतील दुसरा टप्पा सुरु झाला. २२ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालणार असून ऐंशी अंतर्गत रस्ते स्वच्छ होतील.
पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून ही मोहीम आखण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत आणि कौतुक केले आहे.
सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे, बाबासाहेब इंगळे आदींसह अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेत शहरातील ऐंशी रस्ते आणि विविध नगरातील रस्त्यांची साफसफाई नेटक्या पध्दतीने करण्यात येणार आहे. यामुळे अंतर्गत शहरातील रस्तेही आता अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहेत.
यासाठी झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मोहिमेत महापालिकेचे विविध विभाग कार्यरत राहणार आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग, एक ते आठ विभागीय अधिकारी, आवेक्षक, उद्यान विभाग, संगणक विभाग आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभाग यांचा समावेश आहे. सकाळी साडेसहा ते अकरा या वेळेत ही स्वच्छता व साफसफाईची कामे करण्यात येणार आहेत.