18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयएकतर आंबेडकर फेल अथवा आंबेडकरवादी

एकतर आंबेडकर फेल अथवा आंबेडकरवादी

शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल

वाराणसी : ज्योतिषी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जातीय आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले आरक्षण व्यवस्था ही केवळ १० वर्षांसाठी होती. लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालावे असे कधी बाबासाहेबांनाही वाटले नाही. मात्र त्याची अंमलबजावणी होऊन ७८ वर्षे उलटली, तरीही ज्या वर्गासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली, तो वर्ग मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेला नाही. याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी फेल झाले. एवढेच नाही तर, लोकांनी यामध्ये न जाता शिक्षण, आरोग्य आदींशी संबंधित आपल्या समस्या मांडायला हव्यात, असेही ते म्हणाले.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सोमवारी काशी येथे आले होते. येथे केदारघाट येथील श्रीविद्यामठ येथे डॉ. हरिप्रकाश पांडे यांच्या हस्ते सपत्निक पादुका पूजन करण्यात आले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना शंकराचार्यांनी वरील भाष्य केल्याचे बोलले जात आहे. ते म्हणाले, ७८ वर्षे झाली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासंदर्भात बोलले जात आहे. जे लोक आंबेडकरांच्या मागे होते, त्यांनी ७८ वर्षांत किती प्रगती साधली. १० वर्षे आरक्षण दिले होते, ७८ वर्षे झाली हे आरक्षण सुरूच आहे आणि ते रद्द होऊ नये यासाठी त्यांचे लोक लढत आहे. आपण आयुष्यभर पंगू होऊन आरक्षणाच्या कुबड्यांवर उभे रहावे, यासाठी आरक्षण दिले नव्हते.

ते पुढे म्हणाले, आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी आंबेडकर साहेबांनी आरक्षण दिले होते. आपण कुठे येऊ शकलात? जे लोक आंबेडकरांचे नाव घेतात, मला त्यांनाच विचारायचे आहे की, त्यांनी आंबेडकरांच्या भावनेचे किती काळजी घेतली? आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते की, पुढील दोनशे वर्षे, हजार वर्षे लोकांनी आरक्षणाचा उपभोग घेत राहावा. आरक्षणाच्या माध्यमाने समाजाने मुख्य प्रवाहात यावे, अशी त्यांची अपेक्षा होती. आपण ७८ वर्षापासून मुख्य प्रवाहात सामील होऊ शकला नाहीत. याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी फेल झाले.

शंकराचार्य पुढे म्हणाले, आमचे म्हणणे आहे की, या भानगडीत जाऊ नका. आपल्याला ज्या काही समस्या असतील, आपल्याला शिक्षण मिळत नाही, शिक्षणाची मागणी करता. आपल्याला आरोग्य सुविधा मिळत नाहीत, आरोग्याची मागणी करा. आपल्याला मुख्य प्रवाहात आणले जात नाही, कुठेतरी आपला अपमान होतोय, असे मुद्दे उचला की, जर समाज एक आहे, तर मग भेदभाव व्हायला नको. हे ठीक आहे, पण आंबेडकरांचा कुणी मान केला, कुणी अपमान केला, आपण याचाच ढोल वाजवत बसा आणि राजकारण्यांना जे करायचे आहे, ते करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR