28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निकालानंतर १५ व्या विधानसभेमध्ये शिवसेना (शिंदे गट) विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी रात्री मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.

या बैठकीत ४ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा ठराव म्हणजे एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिंदे गटाकडून याबाबत अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने मतांचे भरभरुन दान शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पदरात टाकले. ज्या हिरीरीने आणि उमेदीने मतदारांनी निर्विवाद आणि सुस्पष्ट कौल दिला, त्याला राज्याच्या राजकीय इतिहासात तोड नाही. असा ऐतिहासिक विजय कुठल्याही पक्षाला आजवर मिळाला नाही, ते यश आई भवानीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला प्राप्त झाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने जनतेनेच पूर्ण करुन दिले आहे. रयतेचे लोककल्याणकारी राज्य साकारण्याचे शिवधनुष्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी यशस्वीरित्या पेलले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची त्यांना समर्थ साथ लाभली. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने जो उदंड प्रतिसाद दिला, त्यासाठी जनतेच्या आभाराचा ठराव येथे मांडत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR