मुंबई : प्रतिनिधी
राजकारणात काहीही अशक्य नसते. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,असे सांगतानाच एकनाथ शिंदे पूर्वीच काँग्रेसमध्ये जाणार होते, अहमद पटेल आता नाहीत पण पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, ते काय झाले होते ते सांगतील. एकनाथ शिंदेंची दिल्लीत कोणाशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी आज केला.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेसमध्ये यावं, त्यांना आम्ही मुख्यमंत्री करु असं नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोलेंच्या या ऑफरवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचाच गेली, मी यावर काय बोलणार, अशी खिल्ली संजय राऊत यांनी उडवली. नाना पटोले आमचे सहकारी आहेत जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा भगव्या रंगाशी काहीही संबंध नाही. त्यांचा भाजपशी संबंध आहे. ते भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. पूर्वी एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. अहमद पटेल आता आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव घेणे योग्य नाही. पण पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.