32.5 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रशब्द न पाळणा-या एकनाथ शिंदेंची सभा उधळणार

शब्द न पाळणा-या एकनाथ शिंदेंची सभा उधळणार

कोल्हापुरातील संघर्ष समितीचा इशारा

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले, मात्र आता त्यांनी शब्द फिरवत गद्दारी केली आहे. त्यामुळे उद्या, शनिवारी त्यांची सरवडे (ता. राधानगरी) येथे होणारी सभा उधळून लावणार असल्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी गुरुवारी दिला.

सर्किट हाऊस येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. फोंडे म्हणाले, एकनाथ शिंदे हे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊनदेखील न पाळता शेतक-यांशी गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. १२ मार्चच्या मुंबई मोर्चावेळीही एकनाथ शिंदे शेतक-यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही.

कुणाल कामराचे गाणे लावून विरोध
कुणाल कामराचे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल. १ मे महाराष्ट्र दिनी कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, महायुती सरकार आंदोलन करणा-यांवर दडपशाही करीत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भीक घालणार नाही. शक्तिपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR